समता सैनिक दल पाचोरा तालुका कार्यालयाचे भव्य उद्घाटन संपन्न
पाचोरा (ता. १३ एप्रिल २०२५): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ मार्च १९२७ रोजी स्थापन केलेल्या समता सैनिक दल या ऐतिहासिक संघटनेच्या पाचोरा तालुका कार्यालयाचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. “गाव तेथे शाखा, घर तिथे सैनिक” या ब्रीदवाक्याला अनुसरून पाचोरा तालुक्यात संघटनेच्या कार्याचा विस्तार होत असून, या कार्यालयाच्या माध्यमातून सामाजिक न्याय व समतेचा लढा अधिक बळकट होणार आहे.
या उद्घाटन प्रसंगी धर्मभूषण बागूल, राज्याध्यक्ष – समता सैनिक दल, महाराष्ट्र राज्य, हे उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु. विजय लेखक, राज्य संघटक – समता सैनिक दल, हे लाभले होते. कार्यक्रमात विनीत किशोर भाऊ डोंगरे, जिल्हाध्यक्ष – समता सैनिक दल, जळगाव, यांनी विशेष मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी संघटनेच्या जिल्हास्तरीय कार्याचे सविस्तर विवेचन केले व युवकांनी समतेच्या लढ्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानेश्वर सावळे, तालुकाध्यक्ष – पाचोरा, यांनी शहर व तालुका कार्यकारिणीसह यशस्वीपणे केले. अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामपातळीवरील सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यात नविन सदस्यांची नोंदणी, शाखा विस्तार व विविध सामाजिक उपक्रमांची घोषणा करण्यात आली.